मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – पोलिसांसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या पदकांची घोषणा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील 57 पोलिसांनी ह्या राष्ट्रपती पोलीस पदकांवर मोहोर उमटवली आहे.
ठाणे क्राईम बँचचे सहाय्यक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम यांनाही राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. कदम यांना त्यांच्या आजवरच्या सेवाकाळात दुसऱ्यांदा या पदकाचा मान मिळाला आहे. कदम यांनी अॅक्शन प्लॅन बनवून ठाण्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यात यश मिळवले. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांचे पाकिस्तान कनेक्शन कदम यांनी उघड केले. त्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा पडला.
चेकमेट वंâपनीवर पडलेल्या अकरा कोटीच्या दरोड्यात कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तपासात अवघ्या 48 तासात आरोपी गजाआड होऊन संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात आली. 150 वाँटेड गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले. नागपाड्यात हसिना पारकरच्या घरात लपून बसलेल्या अंडरवल्र्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह सुरेश पुजारी टोळीच्या हस्तकांच्या कदम यांनी मुसक्या आवळल्या. खंडणीखोरांवर धडक कारवाई करून त्यांना चाप लावला. हल्ले आणि गोळीबार प्रकरणातील गुन्हेगारांना मोक्का लावून त्यांना गजाआड केले. पुण्यातील कॉसमॉस बँकेवर हॅकर्सनी घातलेल्या 94 कोटीच्या दरोड्यात देशाबाहेरील हॅकर्सनाही अटक करण्यात ते यशस्वी ठरले.







