बहुपयोगी आणि औषधी उंबर (औदुंबर) वृक्ष

    audumber

    (जळगाव संपादक सुनिल पाटील)
    उंबर वृक्षाला ‘औदुंबर’ या नावानेही संबोधतात. उंबराच्या दोन प्रकारच्या जाती आहेत. उंबर आणि काकोदुम्बर. काकोदुम्बराला ग्रामीण भाषेत ‘गांड्या उंबर’ म्हणण्याची प्रथा आहे; कारण त्याला तळापासूनच उंबराची फळे लागतात. उंबराला हिंदीमध्ये ‘गुलर’ असे म्हटले जाते. उंबर हा लहान झाळकट वृक्ष असून विविध लहान-मोठ्या नद्यांच्या किनार्‍यावर याची वस्ती असते.

    उंबराची साल, फळे आणि काही प्रमाणात पाने यांचा औषधी वापर आहे. जमिनीत खोलवर असलेल्या उंबराच्या मुळांचे पाणी युक्तीने काढावे. त्याला विविध हट्टी विकारांवर तात्काळ आराम देण्याचा विशेष गुण आहे. या वनस्पतीत साबणासारखा एक पदार्थ आहे. त्यामुळे रिठा आणि शिकेकाई यांना पर्याय म्हणून आंतरसालीच्या चूर्णाचा वापर केला जातो. उंबराची साल स्तंभन (स्तंभन हे एक कर्म आहे. याचा अर्थ थांबवणे किंवा अवरोधन करणे) आहे. पक्व फळे शीतल, स्तंभक (हे कर्म करणार्‍याला स्तंभक म्हणतात) आणि रक्तसंग्राहक आहेत.

    उंबराच्या चिकाचे औषधी गुणधर्म

    उंबराच्या चिकामध्ये वरील गुणांसह चटकन सूज न्यून करणे आणि शरीर पुष्ट करण्याचे गुण आहेत. उंबराचा चिक अल्प प्रमाणात दूध साखरेतून त्याकरता दिला जातो. उंबर फळांचा उपयोग ज्या रोगात रक्त वहाते, सूज येते किंवा लघवीतून रक्त येणे, रक्ती आव, अत्यार्तव, गोवर, कांजिण्या अशा लहान-मोठ्या रोगांमध्ये होतो. उंबराचा चिक रक्ती आव, तसेच अतीकृश लहान मुले वाढीस लागावी, म्हणून देण्याचा प्रघात एकेकाळी असे. त्याकरता चिकाचे १० थेंब दुधासह द्यावे. गालगुंड, गंडमाळा, खूप पू असणार्‍या जखमा आणि हट्टी सूज यांवर उंबराचा चिक लावला असता वेदना अन् सूज लवकर न्यून होते. उंबराच्या पानावर लहान फोड येत असतात. ते फोड दुधात वाटून दिल्यास गोवर कांजिण्या विकारात सत्वर आराम मिळतो.

    उंबराच्या फळांचे औषधी गुणधर्म

    काही मंडळींना मद्यपान, धूम्रपान, तंबाखू यांचे व्यसन असते. या व्यसनांमुळे यकृतवृद्धी होते आणि जलोदराची धास्ती असते. काहींना बाहेरील वारंवारच्या खाण्या-पिण्यामुळे कावीळचा संसर्ग पुन:पुन्हा होत असतो. अशांनी बकरीच्या दुधात उंबराची फळे उकडून ती खाल्ल्यास पंधरवड्यात खूप आराम मिळतो. जळवात, टाचांना फोड येणे, रक्त वहाणे या विकारांत उंबराची फळे वाटून त्याचा लेप करून त्यावर रात्रभर स्वच्छ फडक्याने बांधून ठेवावा. त्याने सत्वर गुण येतो.
    उंबराचे साल आणि आंतरसाल यांचे गुणधर्म

    मलेरिया किंवा हिवताप विकारात उंबराच्या सालीचे चूर्ण दुधातून घ्यावे. सालीचा काढा कदापि करू नये; कारण उष्णतेने त्यातील ज्वरघ्न गुण जातो. दिवसेंदिवस मधुमेह या विकाराचे आक्रमण खूप मोठ्या संख्येने ग्रामीण आणि शहरातील मंडळींना भोगावे लागत आहे. मधुमेहाची खूप औषधे घेऊन रुग्ण कंटाळलेले असतात. अशा अवस्थेत उंबर, वड, पिंपळ, पायरी अशा क्षीरीवृक्षांच्या आंतरसालीचे चूर्ण नियमितपणे घेतल्यास मधुमेहाला प्रतिबंध होतो.

    – वैद्य प.य. वैद्य खडीवाले

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here