नवी दिल्ली – अपघाताला कुठलं छोटंसं कारण पुरेल आणि कधी कुठलं मशीन किंवा आणखी काही काळ बनून समोर येईल सांगता येत नाही. नेहमीच्या पिठाच्या गिरणीत केस अडकायचं निमित्त एका महिलेच्या भयंकर अंताला कारणीभूत ठरलं. क्षणिक दुर्लक्ष थेट तिला जीवानिशी घेऊन गेलं. पंजाबच्या फिरोजपूरमधून एक अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे.फिरोजपूरमधील एका गावात पीठ दळण्याच्या गिरणीमध्ये अडकून एका कामगार महिलेचा मृत्यू झाला आहे.
बलजीत कौर नावाची 30 वर्षांची महिला पिठाच्या गिरणीत काम करते. पीठ दळून देत असताना तिचे लांबसडक केस पिठाच्या गिरणीमध्ये अडकले होते. या घटनेत महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.महिलेचे केस गिरणीत अडकले आणि पुढे त्याच जोराने तिचं डोकंही चक्कीत गेलं. अखेर शीर धडावेगळं झालं. या घटने तच महिलेचा मृत्यू झाला. ही महिला फिरोजपूरमधील एका पीठाच्या गिरणीवर काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला बलजीत कौर सेखवान गावातील रहिवासी होती. पीठाच्या गिरणीमध्ये धान्य दळण्यासाठी एक ग्राहक आला होता. यादरम्यान ग्राहकाच्या समोरच हा संपूर्ण प्रकार घडला.
गिरणीमध्ये धान्य दळण्यासाठी टाकलेलं असतानाच सुरुवातीला महिलेचे केस अचानक या गिरणीमध्ये अडकले. यानंतर महिलेचं डोकंही गिरणीमध्ये ओढलं गेलं. या घटनेत संबंधित महिलेचं डोकं धडावेगळं झालं. ही घटना इतकी भयंकर होती, की यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. याबद्दल माहिती मिळताच काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. तसंच महिलेचं शरीर शवविच्छेदनासाठी पाठवलं. सोबतच या घटनेची नोंददेखील करुन घेण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







