लातूर (प्रतिनिधी) – चाकूर तालुक्यातील वडवळसह परिसरात पालेभाज्यासह टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बाजारात टोमॅटोचे भाव अचानक कमी झाल्याने मजुरीचा, वाहतुकीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर टाकले असून त्यावर जनावरे सोडली आहेत. टोमॅटो तोडणी, बाजारपेठेतील वाहतूक खर्च शेतकऱ्यांनाच सोसावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून सर्वत्र टोमॅटोचा चिखल झाल्याचे दिसत आहे.
यंदा खरीप पिकाच्या काढणीनंतर रब्बी हंगामात चारशे हेक्टरहुन अधिक क्षेत्रांवर येथील शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. मात्र बाजारपेठेत भाव कोसळल्याने उत्पादन खर्चही शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. टोमॅटोचे पीक घेऊन गेल्यावर वाहन भाडेही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी जनावरांना चारा म्हणून टोमॅटोचे ढीग लावल्याचे चित्र वडवळमध्ये पहावयास मिळत आहे. बाजारात टोमॅटो पिकाला मागणी नसल्याने अनेक शेतकरी टोमॅटो तोडतच नाहीत. वडवळ येथील टोमॅटोचे पीक देशासह विदेशातही पाठविले जातात. यंदा मात्र टोमॅटो उत्पादकांची अवस्था दयनीय झाली आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक आर्थिक अडचणीत आले आहेत.







