दिल्ली हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून अमित शहा यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसची मागणी

amit-shah

नवी दिल्ली – प्रजासत्ताकदिनी दिल्लीमध्ये आयोजित शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांना गृहमंत्रीपदावरून हटवावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

40-50 ट्रॅक्टर आणि शेकडो उपद्रवी आंदोलक लाल किल्ल्यामध्ये घुसले कसे? असा सवाल सुरजेवाला यांनी केला असून दिप संधू यांना लीड करत होता असाही आरोप त्यांनी केला. हिंसाचार रोखण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची नाही, तर सरकारची आहे. सरकार याच अपयशी ठरले आहे. लाल किल्ला स्वातंत्र्यांचे प्रतिक आहे. त्यामुळे 500 ते 700 च्या संख्येने उपद्रवी लोक लाल किल्ल्यात घुसले कसे? त्यांना लीड करणारा दिप संधू पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या बाजूला उभा राहून फोटो काढतोय. त्याला आणि आंदोलकांना लाल किल्ल्यात घुसण्याची परवानगी कोणी दिली? पोलीस खुर्च्यावर बसून तमाशा पाहत होती का? असा सवालही सुरजेवाला यांनी केला.

आंदोलकांना लाल किल्ल्यामध्ये घुसून दिले, असा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी केला. यावेळी मोदी-शहा यांचा चेला दिप संधूची उपस्थिती आश्चर्यकारक होती, असेही ते म्हणाले. दिल्लीत सुरु असलेले शेतकरी आंदोलन केंद्र सरकारला ‘बळ’पूर्वक हटवता न आल्याने ‘छळ’पूर्वक हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असाही आरोप सुरजेवाला यांनी केला. तसेच आधी दुर्लक्ष करा, चर्चेचा रतीब लावा, फूट पाडा, बदनाम करा आणि नंतर हाकलून लावा ही मोदी-शाह सरकारची निती असल्याचेही ते म्हणाले.

दिल्ली हिंसाचार गुप्तचर यंत्रणेचे अपयश असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी रणदीप सुरजेवाला यांनी केली. गेल्या वर्षभरात राजधानीमध्ये झालेली हिंसाचाराची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे शहांनी राजीनामा द्यावा. पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांविरोधात कोणतीही कारवाई न केल्यास ते अमित शहा यांचा बचाव करत आहेत, असाच याचा अर्थ निघेल, असेही सुरजेवाला म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here