गृहमंत्र्यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती – खासदार रक्षाताई खडसे

rakshatai-khadse

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ट्विटर पोस्टवर भाजपा खासदार रक्षाताई खडसेंची उघड नाराजी

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी संकेतस्थळावरील आक्षेपार्ह उल्लेखाची दखल घेतली, ही चांगली बाब आहे. परंतु, दुसरीकडे मला वाईट या गोष्टीचे वाटले, की त्यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती, अशा शब्दांत भाजपा खासदार रक्षाताई खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली. त्या . जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलत होत्या.

याबाबत बोलतांना त्या पुढे म्हणाल्या की, की राजकारणात असताना आपल्यासोबत चांगल्या गोष्टी पण घडत असतात आणि काही यंत्रणांच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी पण घडत असतात. ही गोष्ट घडून गेली आहे. ती फार मोठी करण्यासारखी नाही. या प्रकरणाची आता चौकशी होत आहे. जो कुणी व्यक्ती यात दोषी असेल, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मला वाटते. हा विषय फक्त माझ्यापुरता नाहीये, तर देशात राहणाऱ्या प्रत्येक महिलेच्या बाबतीत तिला बदनाम करण्याचे कृत्य व्हायला नको, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भाजपाच्या अधिकृत संकेतस्थळावर खासदार रक्षा खडसेंच्या बाबतीत आक्षेपार्ह उल्लेख केल्याच्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याप्रश्नी आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आज दुपारी जळगावात असताना खासदार रक्षा खडसेंनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भूमिकेचे स्वागत केले, पण गृहमंत्र्यांनी सोशल मीडियावर ती आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याने उघड नाराजी व्यक्त केली. अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा मिळालीच पाहिजे. पण गृहमंत्र्यांनी आक्षेपार्ह शब्द असलेली पोस्ट त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकायला नको होती, असे त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here