नवी दिल्ली – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. देशातील १६ विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मागील पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत विरोधी पक्षांची मागणी फेटाळून केंद्र सरकारने तीन वादग्रस्त कृषी विधेयके घाईघाईने मंजूर केले. या कृतीचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे हे अधिवेशन कृषी कायद्यांमुळे चांगलेच गाजणार आहे.
राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर आम्ही 16 राजकीय पक्षांच्या वतीने निवेदन जारी करत आहोत, असे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, सपा, आरजेडी, माकप, सीपीआय, आयआयएमएल, आरएसपी, पीडीपी, एमडीएमके, केरळ काँग्रेस (एम) आणि एआययूडीएफ यांनी संयुक्तपणे घेतला आहे.
हे अधिवेशन दोन भागांमध्ये होणार आहे. २९ जानेवारी ते १५ फेब्रुवारी असा या अधिवेशनाचा पहिला टप्पा असेल. तर, आठ मार्च ते आठ एप्रिलपर्यंत या अधिवेशनाचा दुसरा टप्पा पार पडेल. तसेच, १७व्या लोकसभेच्या पाचव्या अधिवेशनात ३५ बैठका होणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात यातील ११ बैठका पार पडतील. तर, दुसऱ्या टप्प्यात २४ बैठका पार पडतील.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आज (२९ जानेवारी) संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करतील. तर, एक फेब्रुवारीला निर्मला सीतारामण या सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर १५ फेब्रुवारीला या अधिवेशनाचे कामकाज तहकूब करण्यात येईल.







