नवी दिल्ली – दिल्लीतील शेतकरी आंदोलनात एका शेतकऱ्याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाल्याची खोटी बातमी देणे ‘इंडिया टुडे’चे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांना चांगलेच महागात पडले आहे. कंपनीने त्यांना दोन आठवडे टीव्हीवर येण्यास बंदी घातली आहे. इतकेच नव्हे तर त्यांचा एक महिन्याचा पगारही कापला आहे.
नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. त्यावेळी राजदीप सरदेसाई यांनी ट्विटरवर एक ट्विट केले होते. ‘पोलिसांच्या गोळीबारात नवनीत नावाच्या 45 कर्षीय शेतकऱयाचा मृत्यू झाला. त्याचे बलिदान आम्ही काया जाऊ देणार नाही असे मला शेतकऱ्यांनी सांगितले.’ असे सरदेसाई यांनी ट्विटमध्ये लिहिले होते.
दिल्ली पोलिसांनी मात्र त्या शेतकऱ्याचा मृत्यू त्याचा ट्रक्टर पलटल्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले होते. पुराव्यादाखल पोलिसांनी एक व्हिडीओही जारी केला होता. त्यात संबंधित शेतकऱ्याचे ट्रक्टरवरील नियंत्रण सुटल्याने तो पलटी झाल्याचे दिसत होते. ‘इंडिया टुडे’च्या न्यूज क्लिपमध्ये राजदीप सरदेसाई हे अन्य एका पत्रकाराशी बोलताना शेतकऱ्याचा गोळीबारात मृत्यू झाल्याचे सांगत असल्याचे सर्वांनी पाहिले.
पोलिसांनी व्हिडियो जारी केल्यानंतर सरदेसाई यांनी आपले वक्तव्य बदलले. त्यांनी ट्विटरवर पोलिसांच्या त्या व्हिडियोचा संदर्भ दिला आणि पोलिसांनी लावलेले बॅरीकेड्स तोडताना शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी झाला असे नमूद केले. अनेक राजकीय नेत्यांनी याप्रकरणी राजदीप सरदेसाई यांच्याविरुध्द एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. ‘इंडिया टुडे’ने केलेल्या कारवाईला सरदेसाई यांनीही एका इंग्रजी वृत्तवाहिनीवर दुजोरा दिला आहे







