नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारानंतर हरयाणा आणि उत्तर प्रदेश सीमेवर तणाव वाढत आहे. सिंघू सीमेवर शुक्रवारी हिंसक घटनांनंतर कारवाई करत हरयाणा सरकारने शनिवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत १४ जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवेवर बंदी घातली आहे. नागरिकांना आता फक्त फोनवर बोलण्याची सुविधा असेल. हरयाणा सरकारच्या आदेशानंतर अंबाला, यमुना नगर, कुरुक्षेत्र, करनाल, कैथल, पानीपत, हिसार, जिंद, रोहतक, भिवानी, चरखी दादरी, फतेहाबाद, रेवाडी आणि सिरसा या जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा त्वरित बंद करण्यात आली. अफवा रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.
सिंघू सीमेवर राहणारे नागरिक गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकर्यांचा निषेध करत आहेत. शेतकऱ्यांना तातडीने धरणे आंदोलनावरून हटवावं, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी शेतकर्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी परिस्थिती तणावाची बनली. शेतकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. लाठ्या काठ्यांनी हल्ला करत आणि दगडफेक सुरू केली. परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून पोलिसांना लाठीमार करावा लागला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
दिल्ली गाझीपूर सीमेवर गेल्या तीन दिवसांपासून तणाव आहे. यामुळे दिल्लीला लागून असलेल्या सीमावर्ती भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी गाझीपूर सीमेवर ठिय्या देऊन आहेत. राकेश टिकैट यांच्या समर्थनार्थ त्यांचा मूळ जिल्हा मुझफ्फरनगर येथे किसान महापंचायत सुरू आहे. आसपासच्या राज्यांतूनही हजारो शेतकरी येत आहेत.







