मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – अंधेरीतील अंबोलीच्या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अंबोली पोलिसांनी अटक केली. ज्ञानबा रघुनाथ भानगे (वय 50) असे या आरोपीचे नाव आहे.
नालासोपारा परिसरातील ज्ञानबा हा अंधेरीतील एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. 25 जानेवारीला सायंकाळी दोन मुली इमारतीच्या परिसरात खेळत होत्या. त्यातील एकीचे वय 11, तर दुसरीचे वय 12 आहे. या मुली खेळत असताना आरोपी ज्ञानबाने त्यांना पाहिले. त्यानंतर त्यांना जवळ बोलावून ज्ञानबा त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास बघून घेण्याची धमकी त्याने मुलींना दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलींच्या वागण्यात बदल झाला होता.
कुटुंबीयांना तो जाणल्यानंतर पालकांनी मुलींना विश्वासात घेऊन चौकशी केली. त्या वेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ज्ञानबावर अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.







