नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – सोमवारपासून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्याची मुभा सरकारकडून देण्यात आली. तरी हार्बर मार्गावरील पनवेल ते CSMT स्थानकापर्यंत लोकलच्या वेळापत्रक बाबतीत मात्र रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळाले.
लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वेगात होण्याची शक्यता लक्षात घेत लॉकडाऊन काळात लोकल प्रवास बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होताच मिशन बिगिन अगेन अंतर्गत सुरुवातीला वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसोबत सरकारी खात्यात काम करणाऱ्या कामगारवर्गकरिता लोकल प्रवासाचे दरवाजे खुले करण्यात आले.
ऑक्टोबर 2020 पासून महिला प्रवाशांना देखील लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आल्याने सर्वच सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांकरिता लोकल प्रवास पुन्हा सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 1 फेब्रुवारीपासून अखेर सर्वसामान्य प्रवाशांकरिता लोकल प्रवास पुन्हा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर करत सोमवारी सकाळी 7 पासून हार्बर मार्गावरील पनवेल ते सी एस एम टी पर्यंतची सर्वसामान्य प्रवाशांकरीता पहिली लोकल धावली आहे.
पनवेल येथून CSMT कडे जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकातून पहाटे 7 ला पहिली लोकल सोडण्यात येणार आहे. 12 वाजता दुसरी लोकल सोडण्यात येणार असल्याने सकाळी 9 ते 10 या वेळेत मुंबई परिसरातील कार्यालयांमध्ये कामावर जाणाऱ्या लोकल प्रवाशांना सकाळची पहिली लोकल पकडून कार्यालयीन वेळेपेक्षा काही तास अगोदर अथवा 12 ची लोकल पकडून काही तास उशिरा कार्यालय गाठावे लागणार असल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांना या लोकल प्रवासाचा कोणताच फायदा होणार नसल्याचे मत प्रवाश्यांनी व्यक्त केले.
पनवेल, खांदेश्वर, कामोठे परिसरातून मुबंई परिसरात कामावर जाणाऱ्यांची संख्या मोठी असून, रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी येथील प्रवाशी मोठ्या प्रमाणात शेयर रिक्षेवर अवलंबून आहेत. लोकल प्रवास पुन्हा सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेले रिक्षा चालक मात्र सर्वसामान्य प्रवाशांकरिता लोकल सुरु झाल्याने आनंदीत आहेत.







