बदलीच्या वादातून सुरक्षारक्षकाची हत्या

murder

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – बदलीच्या वादातून सहकाऱ्याने सहकाऱ्याची हत्या केल्याची घटना लोअर परळ परिसरात घडली. दयाशंकर जैस्वार असे मृताचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी ब्रिजेशकुमार सिंगला वरळी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. दयाशंकरच्या हत्येनंतर पोलिसांनी पकडू नये म्हणून तीन चोरटय़ांनी दयाशंकरची हत्या केल्याचा बनाव ब्रिजेशने रचला होता.

दयाशंकर हा लोअर परळ येथील एका खासगी विकासकाच्या साइडवर सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तेथेच ब्रिजेशकुमार, शिवकरण शर्मा आणि मनोजकुमार सिंग हेदेखील काम करतात. दयाशंकर आणि ब्रिजेशमध्ये बदली करण्यावरून वाद होत होते. शानिवारी रात्री त्या चौघांनी एकत्र जेवण केल्यावर ब्रिजेशकुमार आणि दयाशंकर रात्रपाळीस आले. तेव्हा पुन्हा त्या दोघांमध्ये वाद झाला. रात्री पावणे एकच्या सुमारास ब्रिजेशने दयाशंकरच्या डोक्यात हातोडा मारून त्यानंतर त्याची गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर ब्रिजेशने शिवकरण आणि मनोजकुमारला उठवले. रात्री तीन चोर साइडमध्ये शिरले. त्या तिघांनी दयाशंकरची हत्या करून पळ काढला असा ब्रिजेशने बनाव रचला. जखमी अवस्थेत असलेल्या दयाशंकरला उपचारासाठी केईम रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती समजताच वरळी पोलीस घटनास्थळी गेले. प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या पथकातील चौधरी, कारके, साळोखे, मदने, खोंडे यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी ब्रिजेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले. ब्रिजेशने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगळी माहिती दिली. कसून चौकशी केल्यावर ब्रिजेशने दयाशंकरच्या हत्येची कबुली दिली. दयाशंकरच्या हत्येप्रकरणी ब्रिजेशला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here