प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड

solapur-hospital

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – सोलापूरच्या माळशिरस जवळील वेळापूर या ठिकाणी प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती अचानक बिघडून तिचा मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी संबंधित रुग्णालयाची तोडफोड केली आहे. हल्लेखोर नातेवाईकांनी दगड आणि काठ्यांच्या साहाय्याने रुग्णालयाच्या काचा, रुग्णालयातील किंमती वस्तू आणि फर्निचरचं प्रचंड नुकसान केलं आहे. या हल्ल्यात रुग्नालयाचे जवळपास 6 लाखांचे नुकसान झाल्याचं डॉक्टरांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी 19 वर्षीय पायल अनिल मगर यांना वेळापूरच्या नाईक हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होममध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी प्रसूतीनंतर संबंधित महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने तिला अकलूज येथे उपचारासाठी हलवण्यात आलं. पण तिला अकलूजला उपचारासाठी घेवून जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी संबंधित मृत्यूसाठी डॉ. नाईक दाम्पत्य यांना जबाबदार धरलं. त्यानंतर मृत महिलेच्या माहेरील नातेवाईकांनी डॉ. नाईक दाम्पत्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असतानाच, रविवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलवर हल्ला केला. त्यांनी आपल्या हातातील दगड आणि काठीने हॉस्पिटलच्या काचा, दरवाजे, खुर्च्या, टेबल, उपकरणे, फर्निचर आदी वस्तूंची तोडफोड केली. त्याचबरोबर डॉक्‍टरांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांना मारहाणही केली. डॉक्टरांच्या राहत्या घरामध्ये घुसून नातेवाईकांनी रोख रकमेसह काही मौल्यवान ऐवज चोरला असल्याचं डॉक्टरांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी डॉक्टरांनी अशोक रामचंद्र थोरात, रोहित अशोक थोरात, प्रशांत कृष्ण सावंत आणि राहुल विजय थोरात यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. हे सर्व आरोपी माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी येथील रहिवासी आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं. वेळापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या घटनेचा पुढील तपास वेळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव आणि त्यांची टीम करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here