मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘आदिपुरूष’ या चित्रपटाच्या सेटवर भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ‘पिंकव्हिला‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
‘आदिपुरूष’ या चित्रपटाचा सेट मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा मुहूर्त आजच करण्यात आला होता. मात्र मुहूर्ताच्याच दिवशी मंगळवारी दुपारच्या सुमारास सेटला आग लागली. आगीमध्ये सेटचा काही भाग जळून खाक झाला आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे चित्रपटातील सर्व कलाकार सुरक्षित आहेत, मात्र या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.
‘बाहुबली’ चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला सुपरस्टार प्रभास ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ओम राऊत या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट श्रीरामचंद्रांवर आधारित असून या चित्रपटात प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, सैफ रावणाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट थ्रीडी अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून, भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत.







