शिरोमणि अकाली दलाच्या अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; पंजाबमध्ये तणावाचे वातावरण

akali-dal-in-panjab

चंदीगड (पंजाब) – शिरोमणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर जलालाबाद येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुखबीर सिंग बादल यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर पंजाबमध्ये तणावाचे वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे.

पंजाबमध्ये सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सुखबीर सिंग बादल उमेदवारांसोबत जलालाबाद येथे आले होते. अर्ज दाखल करताना शिरोमणि अकाली दल आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिरोमणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्या गाडीवर हल्ला केला. यादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आणि गोळीबारही करण्यात आला. यामुळे वातावरण तणावाचे झाले आहे.

निवडणूक अर्ज दाखल करताना झालेल्या या झटापटीमुळे शिरोमणि अकाली दलाच्या एका गाडीचे, तर काँग्रेसच्या दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. तसेच या दरम्यान अनेक जण जखमी झाले आहेत. शिरोमणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल सुरक्षित असल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

काँग्रेस आणि शिरोमणि अकाली दलाने एकमेकांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. अकाली दलाचे नेते सत्येंद्रजीत सिंग मंटा यांनी काँग्रेसवर गोळीबाराचा आरोप केला असून यात तीन कार्यकर्ते जखमी झाल्याचे म्हटले. तर काँग्रेस आमदार रवींद्र सिंग आवला यांच्या दोन गाड्यांचे अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी नुकसान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

दरम्यान, जलालाबाद येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिरोमणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी धरणे आंदोलन केले. त्यांना वाटले गोळीबार करून शिरोमणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांना आपण धमकावू, मात्र पहा आता कोण पळून जातेय? त्यांना पळून जावे लागत आहे, असे विधान सुखबीर सिंग बादल यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here