ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – व्यसनाधीन होणारी तरुणाई हा देशापुढचा मोठाच गंभीर प्रश्न आहे. व्यसनाधीनतेतूनच तरुण गुन्हेगारीकडेही वळत आहेत. अगदी थेट जीव घेण्याच्या घटनाही यातून घडताना दिसतात. मुंबईत अशीच एक घटना समोर आली आहे.
उल्हासनगरात ही घटना घडली आहे. उल्हासनगरच्या साईनाथ भागात एका ठिकाणी काही तरुण गांजा पीत होते. हाफीज शेख यानं हे दृश्य पाहिलं. त्यांनी काळजीपोटी या तरुणांना गांजा पिऊ नका असं सांगितलं. मात्र या तरुणांना हा सल्ला खूपच लागला. त्यांनी संतापात हाफीज याच्याबाबत थेट टोकाचं पाऊल उचललं. या तरुणांनी गांजा पिणं थांबवून हाफीज यांना पकडलं. त्यांना धरून या तरुणांनी त्याचं डोकं विजेच्या खांबाला आपटलं. यात हाफीज याचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं – 5 परिसरातील साईनाथ कॉलनी इथं सोनू या मुलासह इतर मुलं गांजा पीत होती. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजताची ही घटना आहे. यावेळी हाफीज शेख तिथे आले. त्यांनी नशेखोर तरुणांना गांजा पिऊ नका असं सांगितलं. यावर या तरुणांना खूप राग आला. सोनू आणि इतरांनी मिळून हाफिजला मारहाण करायला सुरू केली. सोबतच त्यांनी हाफिजचं डोकं विजेच्या खांबाला आपटलं. यात हाफिजचा जागेवरच मृत्यू झाला. हिललाईन पोलिसांनी सोनूला अटक करून गुन्हा दाखल केला. प्रकरणाबाबत कळताच परिसरात मोठीच खळबळ उडाली आहे.







