दुबई – खाण्या-पिण्याचा शौक अनेकांना असतो व त्यासाठी ‘हौसेला मोल नाही’ असे म्हणत पाण्यासारखा पैसाही खर्च केला जातो. बिर्याणी अनेकांच्या आवडीचा खाद्यपदार्थ आहे. हैदराबादी दम बिर्याणीचे तर देश-विदेशात चाहते आहेत. मात्र, एका ठिकाणी अशी शाही बिर्याणी मिळते ती खाण्यासाठी तुम्हाला खिसा बराच रिकामा करावा लागेल. दुबईतील एका रेस्टॉरंटमध्ये मिळणार्या या बिर्याणीची किंमत एका प्लेटला तब्बल 20 हजार रुपये आहे!
दुबईच्या एका नामांकित रेस्टॉरंटने ही ‘गोल्ड रॉयल बिर्याणी’ लाँच केली आहे. डीआयएफसीमधील ‘बॉम्बे बोरो’ या रेस्टॉरंटमध्ये ही जगातील सर्वात महागडी बिर्याणी मिळते. तब्बल 20 हजार रुपये प्लेट अशा किमतीची ही बिर्याणी तशाच तोलामोलाचीही आहे. या बिर्याणीला 23 कॅरेट सोन्याने गार्निश केले जाते. त्यामुळेच तिचे नाव ‘रॉयल गोल्ड बिर्याणी’ असे ठेवले आहे. या बिर्याणीत काश्मिरी मटण कबाब, जुन्या दिल्लीचे मटण चॉप्स, राजपूत चिकनचे कबाब, मोगलाई कोफ्ते आणि मलाई चिकनचाही वापर केला जातो. बिर्याणीसोबत रायता, करी आणि सॉस दिला जातो. या बिर्याणीची ऑर्डर मिळताच 45 मिनिटांमध्ये ही बिर्याणी सर्व्ह केली जाते. अर्थातच इतकी महागडी बिर्याणी एकाच माणसाला संपवणेही शक्य नाही. ती आपण सहा जणांमध्ये वाटून खाऊ शकतो!







