मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन
अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – आपल्या गावाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून भूमिका पार पाडणे गरजेचे असून, सामाजिक व कौटुंबिक जबाबदारी सांभाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शुक्रवारी (ता.५) जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात केले.
नेहरु युवा केंद्र व रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जलशक्ती अभियान अंतर्गत कॅच द रेन – बचत पाण्याची गरज काळाची या विषयावर शासकीय योजनांमध्ये स्वयंसेवकांचा सहभाग कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी (ता.५) जिल्हा परिषदेच्या स्व. प्रभाकर पाटील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना डॉ. किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले.
प्रशासन व सामाजिक संस्थांनी हातात हात घालून काम केल्यास शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य आहे. प्रशासन व स्वयंसेवी संस्थांना नागरिकांची स्वयंसेवक म्हणून साथ लभल्यास शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचून योग्य लाभार्थ्याला लाभ मिळेल, असेही डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.
जल जीवन योजनेअंतर्गत जिल्ह्यात घराघरात नळाद्वारे पाणी देण्यासाठी नळ कनेक्शन जोडण्याचे काम सुरु आहे. उपलब्ध जलस्त्रोतांचे मजबुतीकरण करण्यासोबत नवीन स्त्रोत कुठे असल्यास नागरिकांनी ते प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावेत, असे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले. या कार्यक्रमात जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश संदीप स्वामी यांनी कोकणात पुरेसा पाऊस पडूनही काही ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होते. पावसाचे पाणी न अडवल्याने ही परिस्थिती निर्माण होत असून, पाणी अडवाल तर ते जमिनीत जिरेल व पाण्याची भूजल पातळी वाढेल, यासाठी लोकसहभाग महत्त्वाचे असल्याचे मत मांडले.
ग्रामविकासात स्वयंसेवकांची भूमिका सा विषयावर राज्यस्तरीय साधनव्यक्ती गणेश शिंदे, बचत पाण्याची गरज काळाची या विषयी अनुभव प्रतिष्ठानचे दिलीप आखाडे, ग्रामविकासात युवकांची साथ या विषयी राज्यस्तरीय साधनव्यक्ती गणेश खातू यांनी उपस्थित सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. ग्रामसंवर्धन संस्थेचे संतोष ठाकूर, योगेश गावंड व टीमने जनजागृतीपर पोवाडा सादर केला. यावेळी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक निशांत रौतेला, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बंकट आर्ले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक जयवंत गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुरल अँड यंग फाऊंडेशनचे सुशील साईकर यांच्यासह सुरेश पाटील यांनी नियोजन केले होते.







