काळ्या जादूने सिद्धी मिळवण्यासाठी दिला सासऱ्याचा बळी

kala-jadu

कौशंबी (उत्तर प्रदेश) – काळ्या जादूच्या नादी लागल्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. काळ्या जादूमुळे काहीजणांनी मांत्रिक, तांत्रिकांच्या सल्ल्याने हत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. उत्तर प्रदेशात अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिद्धी मिळवण्यासाठी एक महिलेने आपल्या सासऱ्यांचाच बळी दिला आहे.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी हत्या झालेल्या वृद्धाच्या सूनेलाच मुख्य आरोपी ठरवले असून या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. काळ्या जादूच्या नादी लागून महिलेने सासऱ्यांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. या हत्येचा उलगडा झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने सासऱ्यांची हत्या केली, यावर गावकऱ्यांचा विश्वासच बसत नाही.

उत्तर प्रदेशातील कौशांबीतील सराय अकील भागातील एका दिव्यांग वृद्धाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती. अकराबादच्या गौहाली गावातील गुरुवारी रात्री घराबाहेर झोपलेल्या दिव्यांग वृद्ध भगवान दास यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी घरातील कुटुंबीय शेजारच्या गावात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला गेले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबीय घरी परतल्यावर त्यांना भगवान दास यांची हत्या झाल्याचे समजले. या घटनेने गावात खळबळ उडाली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत त्यांनी तपासाला सुरुवात केली. हत्या झाली त्यावेळी भगवान दास यांची सून घरात होती. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला. तसेच घटनास्थळाजवळ पूजापाठ आणि तंत्रमंत्राचे साहित्य असल्याने भगवान दास यांचा बळी दिल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. त्यामुळे पोलिसांनी भगवान दास यांच्या सुनेला ताब्यात घेत चौकशी सुरू केली.

चौकशीदरम्यान महिलेने दिलेल्या जबानीने पोलिसही चक्रावले. आपल्या अंगात देवीचा संचार होत असल्याने आपण देवीची साधना करतो. त्यासाठी पूजापाठ आणि तंत्रमंत्र करत असल्याचे तिने सांगितले. देवीच्या आदेशानुसारच आपण कोणतेही काम करत असल्याचा दावाही तिने केला.

महिलेचे सासरे तीन वर्षांपासून पक्षाघाताने आजारी आहेत. पक्षाघाताच्या धक्क्याने ते दिव्यांग झाले आहेत. महिलेला त्यांची सेवा करावी लागत होती. त्यामुळे तिच्या मंत्रतंत्रामध्ये अडचण निर्माण होत होती. त्यामुळे तिने सासऱ्यांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय होता. याबाबत पोलिसांनी तिला विचारले असता तिने केलेल्या खुलाशाने पोलिसांनाही धक्का बसला. देवीला प्रसन्न करून सिद्धी मिळवण्यासाठी आपण सासऱ्यांचा बळी दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

आपल्या अंगात देवीचा संचार होतो. देवीच्या आदेशाने आपण कोणतेही काम करू शकतो, असे तिने गावकऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे गावकरी तिचा आदर करत तिला सन्मान देत होते. मात्र, मंत्रतंत्राच्या नादी लागून ती दिव्यांग सासऱ्यांची सेवा करत नव्हती. सासऱ्यांमुळे तिच्या साधनेत अडचणी येत होत्या. त्यामुळे सिद्धी मिळवण्यासाठी तिने सासऱ्यांचा बळी दिल्याच्या घटनेवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी महिलेला न्यायालयीन कोठडीत पाठवले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here