सातारा (प्रतिनिधी शरद मोरे) – सुर्ली (ता. कराड) येथील बस स्टॉपवर गावठी पिस्तूल बाळगून असणार्या एकास सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून गावठी पिस्तूल व 3 जीवंत काडतुसे असा 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच त्याच्याकडे ज्याने पिस्तूल ठेवण्यास दिले तोही गंभीर गुन्ह्यात फरार असल्याचे समजले. अशा दोघांना अटक करण्यात आले आहे.
त्यानंतर दुसर्या संशयितासही वांगी (जि. सांगली) येथून पोलिसांनी अटक केली. अमोल जगन्नाथ माने, (वय – 32 रा. वनवासमाची ता.कराड), संभाजी संपत मदने, (रा. बनवडी कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुर्ली (ता. कराड) येथील बसस्टॉप जवळील परिसरामध्ये एकजण गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक पुणे शाखेच्या पथकाला मिळाली. यानंतर या पथकाने सुर्ली, बसस्टॉप येथे सायंकाळी 5.25 वा. सुमारास संशयितास पकडून त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या ताब्यात एक गावठी पिस्तूल व 3 जिवंत काडतूस असा एकूण 65 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदर पिस्तूल व काडतूस दुसर्या एकाने त्याच्याकडे ठेवण्यास दिले आहे, असे सांगितले. यानंतर पोलिसांनी दुसऱ्या व्यक्तीलाही अटक केली.







