मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास (Prabhas) ‘बाहुबली’ चित्रपटानंतर प्रचंड चर्चेत आला. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या देखण्या प्रभासवर लाखो तरुण जीव ओवाळून टाकतात. मात्र लवकरच त्याचे दोनाचे चार हात होणार आहेत.
प्रभासला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोस्ट हँडसम बॅचलर मानले जाते. तसेच त्याच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टीही बॅचलर आहे. दोघांमध्ये काहीतरी खिचडी शिजतेय असे वाटत असतानाच नुकत्याच आलेल्या एका बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.‘बाहुबली’मध्ये प्रभास आणि अनुष्काच्या जोडीने हजारो प्रेक्षकांना तिकीट खिडकीकडे चुंबकाप्रमाणे खेचले होते. परंतु आता प्रभास लग्न करत असून अनुष्का नाही तर एका एनआयआर मुलीच्या गळ्यात तो माळ घालणार आहे.
‘बॉलिवूड लाईफ‘ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रभास लवकरच लग्न करणार आहे. परंतु ऑन स्क्रीन त्याच्या प्रेयसीच्या भूमिका केलेली अनुष्का शेट्टी नाही तर एका एनआरआय मुलीला त्याने होकार दिला आहे. प्रभासची होणारी पत्नी ही अमेरिकेतील एका सॉफ्टवेअर कंपनीच्या मालकाची मुलगी आहे. हे लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज असून दोघांच्या कुटुंबीयांमध्ये लग्नाच्या चर्चाही सुरू आहेत. प्रभासनेही या स्थळाला होकार दिल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, प्रभास सध्या आपल्या आगामी ‘राध्ये-श्याम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये तो लव्हर बॉयच्या भूमिकेत दिसणार असून ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात 14 फेब्रुवारीला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रभासच्या लग्नाचा बार उडणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत प्रभास किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून मात्र दुजोरा मिळालेला नाही.







