शहादा (प्रतिनिधी रामेश्वर गिरासे) – नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून या काथर्दे दिगर व परिसरात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक असून शेती व्यवसाय प्रमुख आहे. शासनाने नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्य महामार्ग रुंदी करण्याचे काम सुरू केले आहे शेतकऱ्यांची सहमती न घेता व पुर्व सुचना न देता जमीन भूसंपादित करून रस्त्याचे काम सुरू केले आहे.
याबाबत संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करून जमीन भूसंपादित बाबत चौकशी केली असता शेतकऱ्यांना खुलासा न करता व भूसंपादित जमिनीचे प्रस्ताव तयार न करता उडवा-उडवीचे उत्तर देऊन शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार मोबदला न देता आर्थिक नुकसान करीत आहे. केंद्रीय दळणवळण विभाग मत्रालयाचे भूसंपादित जमिनीचे मोबदला देणे कामी या पुर्वीचे आदेश करून शेतकऱ्यांचे शोषण व पिळवणूक न करता परिपत्रका प्रमाणे TLR विभागाकडून सविस्तर मोजणी करून मोजणी सीटनुसार व प्रचलित बाजार भावाप्रमाणे नुकसान भरपाई मोबदला देण्याचे स्पष्ट आदेश असतांना या भागाचे शेतकऱ्यांसाठी जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार व जिल्हा भूसंपादन अधिकारी यांनी नियमानुसार कोणतीही कारवाई न करता प्रस्ताव विचाराधीन ठेवले आहेत.
या भागातील शेतकरी या पुर्वीच कर्जबाजारी असून अल्पभूधारक आहे. शासनाने सहमती न घेता परस्पर जमीनी संपादित करुन चौपदरी करण्याचे काम सुरू करून अन्याय केला आहे. तसेच राज्य महामार्ग प्रकाशा ते तोरणमाळ दरम्यान रस्ता चौपदरीकरण करण्याच्या कामाबाबत काथर्दे दिगर येथील तालुका शहादा अनेक शेतकऱ्यांनी दिनांक २४-१०-२०२० रोजी जिल्हा अधिकारींकडे तक्रार दाखल केली होती संबंधित प्रकरणातील दखल घेऊन दिनांक १२-११-२०२० रोजी तक्रारदार शेतकरी व मा. तहसीलदार सो. मा. कार्यकारी अभियंता सो. यांचेसह रस्ता कामाचे ठेकेदार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत सर्व बाबींवर सखोल चर्चा होऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून सदर रस्ता नकाशा अधिकृत आहे की नाही या बाबत खात्री करून चौकशी करण्याचे ठरले होते तसेच सर्व शेतकऱ्यांनी सर्व रस्तालगत असणाऱ्या शेतीची मोजणी करून देण्याची मागणीही केली होती.
सदर बैठक होऊन दोन महिने होऊनही संबंधितांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही माहितीच्या अधिकारात मागितलेली माहितीही सा. बा. विभागाने दिलेली नाही त्यामुळे रस्ता ठेकेदारास कोणतेही आदेश नसल्यामुळे अर्धवट काम केल्याने वापरणे अत्यंत त्रासदायक झाल्याने शेतकऱ्यांचे मालवाहतूकीस अनेक अडचणी येत आहेत व रस्त्यावरील धुळीने सर्व पिके खराब होत आहेत साधारणतः शेतकर्यांचे आतापर्यंत दहा ते पंधरा लाखांपर्यंत नुकसान झालेले आहे ऐकून शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे म्हणून सहानुभूतीने विचार करावा व शेतकऱ्यांना न्याय मिळाला यासाठी नंदुरबार जिल्हा अधिकारांना निवेदन ही देण्यात आली होती. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे असे काथर्दे दिगर येथील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व गावातील शेतकरींनी म्हटले आहे







