मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विभागाकडून २०२० – २१ पुरस्कार सन्मान सोहळा बुधवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी मंत्रालय, मुंबई येथे हा समारंभ पार पडला. महाराष्ट्रातील बालगृहातून वाढलेल्या मुलांना प्राप्त परिस्थितीशी सामना करत कोणत्याही प्रकारचे आर्थिक, सामाजिक पाठबळ नसताना आपले जीवन यशस्वी केले. वेळप्रसंगी उपाशी राहून तर हॉटेलमध्ये किंवा दुकानात नोकरी करत. आपले आयुष्य यशस्वी केले. समाजातील मुलांसमोर एक आदर्श निर्माण केला. अशा महाराष्ट्रातील ३३ मुलांचा सत्कार करण्यात आला.

त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ओणी येथे कार्यरत असलेल्या वात्सल्यमंदिर या संस्थेतील ६ मुलांचा गौरव करण्यात आला. हा सत्कार महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर व राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते संपन्न झाला.
या सन्मानात प्रामुख्याने वात्सल्यमंदिर बालकाश्रम ओणीच्या डॉ. गॉंडफ्री फर्नांडिस, फोर्स वन कमांडो अभय तेली, कृषी विद्यापीठ कर्जत येथे वरिष्ठ पदावर कार्यलयात असणारे महेशकुमार विलास घारपुरे, सामाजिक कार्यकर्ते विजय सराटे, संजय सराटे, आर्ट कलाकार वैभव कोळेकर यांचा समावेश होता. संस्थेला आपल्या या कामगिरीचा अभिमान आहे. असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. महेंद्र मोहन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.







