पाटणा – बिहारमध्ये पाऊस जोरदार सुरु आहे. नद्यांना महापूर आला आहे. बिहारच्या छपरा येथील गोपाळगंज येथे २६४ कोटी खर्च करुन बांधण्यात आलेला सत्तघाट पूल पाण्याच्या दाबामुळे वाहून गेला आहे. यामुळे चंपारण आणि सारण या जिल्ह्यांचा संपर्क तुटला आहे. या पुलावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
गंभीर बाब म्हणजे हा पूल अवघ्या २९ दिवसांत वाहून गेला आहे. १६ जून रोजी या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याहस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले होते. गोपाळगंज हा पूल चंपारण आणि तिरुत या जिल्ह्यांशी जोडणारा महत्वाचा पूल आहे. या पूलाच्या बांधकामासाठी सुमारे २६४ कोटी रुपये खर्च आला आहे.
गोपाळगंज येथील नदी पात्रात तीन लाख क्युसेक पेक्षा जास्त पाणी वाहत आहे. यामुळे पूलाचा एक भाग वाहून गेला आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. गोपाळगंजमधील बैकुंठपूरच्या फैजुउल्लापूरमध्ये हा पूल तुटलेला आहे. हा पूल बांधकाम विभागाने बांधला आहे. २०१२ मध्ये या पुलाच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली होती आणि १६ जून २०२० ला या पूलाचे उद्घाटन झाले होते.
पूल बांधकामाच्या चौकशीची मागणी होत आहे. बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांच्या सरकारला घेरले आहे. आरजेडीच्या नेत्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की २६४ कोटी खर्च करुन ८ वर्षात पूल बांधला पण २९ दिवसांत वाहून गेला. बिहारला चारही बाजुंनी लुटले जात आहे.







