मुंबई : मुंबईत इमारत कोसळण्याचं सत्र थांबण्याचं नाव नाहीये. गेले काही दिवस मुंबईत धुवाधार पाऊस पडतोय. याच पावसाचा परिणाम आता मुंबईतील धोकादायक इमारती आणि भिंती कोसळण्याच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. मुंबईतील मालवणी नंतर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या अशा फोर्ट भागात आज आणखी एक इमारत कोसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावण्यात आली होती. धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावल्याने या बिल्डींमधील काही जण इमारत सोडून दुरीकडे वास्तव्यास गेले होते. रहिवासी अधिक कमर्शियल अशा या इमारतीत ३० ते ३५ फ्लॅट्स होते. धक्कादायक बाब म्हणजे एकाबाजुची इमारत कोसल्यांनंतरही दुसऱ्या बाजूला गॅलरीमध्ये काही नागरिक आढल्याचं भयानक चित्र पाहायला मिळतंय. सध्या युद्ध पातळीवर इमारतीचा ढिगारा उपासण्याचं आणि रेस्क्यू ऑपरेशनचं काम सुरु आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार या इमारतीची माती पडू लागण्याने इमारतीमधीलच काही नागरिकांनीच इतरांना इमारत रिकामी करायला सांगितलं होतं. सदर इमारतीचा ४० टक्के भाग कोसल्याचं पोलिसांनी सांगितलंय.







