मुंबई (प्रतिनिधी) – नशेबाज प्रेयसीचे चोचले पुरवण्यासाठी रात्रीच्या वेळेस चोऱ्या करणाऱ्याला आरे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. अजय पांडियन तेवर असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 13 चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. अजय हा आरे कॉलनी 7 नंबरमध्ये राहतो. तर त्याची प्रेयसी गोरेगाव परिसरात राहते. ते दोघेही नशेच्या आहारी गेले आहेत.
अजय हा स्वतःला आणि प्रेयसीला नशा करण्यासाठी चोऱ्या करतो. त्याने काही दिवसांपूर्वी गोरेगावच्या चित्रनगरी येथील गेट नंबर 1 येथील दुकानात चोरी केली होती. चोरीप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याच्या तपास आरे पोलीस करत होते. तपासा दरम्यान पोलिसांनी अजयला ताब्यात घेऊन चौकशी केली.
चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरी केल्यावर मिळणाऱ्या पैशातून तो स्वतः आणि त्याची प्रेयसी हे दोघे नशा करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. चोरीच्या गुन्ह्यात अजयला अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याने आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास आरे पोलीस करत आहेत.






