मुंबई (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. विदर्भात अचानक कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शिवाय मुंबई, पुण्यातही कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. लॉकडाऊन शिथील होताच नागरिक आता बिनधास्त झाले आहेत आणि कोरोनासंबंधी नियमांचं पालन करत नाही आहेत, त्यामुळे राज्यावरील कोरोनाचं संकट पुन्हा वाढलं आहे आणि पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनासंबंधी नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार नी दिले. पण आता त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई मुख्यालयात मोठ्या संख्येनं जमलेले पक्षाचे कार्यकर्ते सर्रासपणे कोरोनासंबंधी नियमांचं उल्लंघन करताना दिसले. कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई मुख्यालयात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले. पण ना त्यांनी मास्क घातला, ना सोशल डिस्टन्सिंग राखलं. कोरोनासंबंधी नियम त्यांनी धाब्यावर बसवले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच कोरोनाच्या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर, मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. असं असताना त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते मात्र नियम पायदळी तुडवताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनासंबंधी नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का, राजकारण्यांसाठी नाहीत का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.






