विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध ठेवल्याने तरुणीला कुटुंबीयांनी जिवंत जाळले

गोरखपूर – विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून कुटुंबीयांनी २८ वर्षीय तरुणीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीचे वडील, भाऊ आणि अन्य दोन नातेवाइकांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी तरुणीच्या हत्येची सुपारी दिली होती. वरुण तिवारी नावाच्या गुंडाला त्यासाठी दीड लाख रुपये दिले होते. अन्य धर्माच्या विवाहित पुरुषासोबत तिचे प्रेमसंबंध होते. यावरून त्यांनी तिच्या हत्येची सुपारी दिली होती.

संत कबीर नगर पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, ‘४ फेब्रुवारी रोजी एका तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह जिगिना गावात आढळून आला होता. स्थानिक पोलीस आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तरुणीची ओळख पटवण्यात आली. गोरखपूरच्या बेलघाट येथील रंजना यादव हिचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.’

तरुणीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या मुलीचे एका विवाहित पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. तिने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडण्यास नकार दिला होता. त्यानंतर मुलीच्या हत्येचा कट रचला. तिच्या हत्येची सुपारी दिली. पोलिसांनी सांगितले की, यातील एका आरोपीने तिला मोटरसायकलवरून जिगिना गावाजवळ निर्जन ठिकाणी नेले. तरुणीचे तोंड आणि हात बांधले. तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here