मुंबई (प्रतिनिधी) – एकीकडे करोनाचे दुष्टचक्र सुरु असताना, पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक तरुणी कामासाठी घराबाहेर पडत आहेत. मात्र काही समाजकंटक याचा गैरफायदा घेताना दिसून येत आहेत. बुधवारी सकाळी वसईत लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणीवर जीवघेणा हल्ला करुन तिला लुटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीररित्या जखमी झाली आहे. जखमी अवस्थेत तरुणीने रुग्णालय गाठले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
आरोपीची ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलीस वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटिव्हीची पडताळणी करत आहेत. आपल्या मैत्रिणीला भेटण्याासाठी तरुणीने नायगाव रेल्वे स्थानकातून सकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान प्लेटफॉर्म १ वरुन अंधेरीला जाणारी स्लो ट्रेन पकडली. त्याच ट्रेनमध्ये आरोपी कधी चढला हे तरुणीला कळलेच नाही. आणि त्याने थेट तरुणीवर हल्ला करुन प्रथम फोन खेचण्याचा प्रयत्न केला. त्याला तरुणीने विरोध केला असता आरोपीने तरुणीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर धारदार वस्तूने हल्ला केला.
तरुणी आरोपीला विरोध करत होती. मात्र त्याचवेळी आरोपीने तरुणीच्या गळ्यातील चेन ओढली आणि तुटलेल्या चेनचा काही भाग घेवून आरोपीने नायगाव स्थानकात उडी घेत पळ काढला. बेसावधपणे झालेल्या हल्ल्यामुळे तरुणीला धक्का बसला आहे. तरुणीच्या डोक्याला जबर मार लागला असून तिच्यावर डॉक्टरांनी उपचार केले असून तिच्या डोक्याला काही टाके पडले आहेत.
पोलीसांनी आरोपीचा शोध सुरु केला असून, त्याने याआधी सुद्धा असे गुन्हे केल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. आरोपी हा वसई रेल्वे स्थानकावर बराच वेळ फिरताना सीसीटिव्ही दिसून येत आहे. मात्र रेल्वे पोलीसांना बुलंद पोलीस टाईम्स काही प्रश्न विचारत आहे. अशा घटना घडू नये यासाठी रेल्वे पोलीसांनी काय उपाययोजन केल्या आहेत? फक्त सीसीटिव्हीच्या आधारावरचं पोलीस दरवेळी अवलंबून राहाणार आहेत का? या निमित्ताने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.






