पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – जोरजोरात सुरू असलेली साऊंड सिस्टीम बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने तुफान दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली. हा संतापजनकप्रकार दोन दिवसांपुर्वी रात्री दहाच्या सुमारास पाषाण येथील लमाणतांडा भागात घडला आहे. या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला असून याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे.
ढेकू भिकू मेघावत (वय ३८), रामा उर्फ प्रमोद हनुमंत मेघावत (वय २४) हिरामण भीमा राठोड (वय २९) लक्ष्मण भीमा राठोड (वय २५) संजय वालिया धानावत (वय २७), व्यंकटेश मोतीराम खेतावत (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्याशिवाय एकनाथ धनावत व खेमु खेतावत यांच्यासह १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पाषाण भागात लमाणतांडा परिसरात दोन दिवसांपुर्वी रात्री दहानंतरही जगदंबा चौकात जोरजोरात साऊंड सिस्टीम सुरू असल्याची माहिती चतुःशृंगी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक कारवाई करण्यासाठी गेले होते. पोलिसांनी साऊंड सिस्टिम बंद करत कारवाई सुरू केली. पण त्यावेळी जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. ढाकू मेघावत याने जमलेल्या मुलांना ‘पोलिसांनी आपले साऊंड बंद करून जप्त केले आहेत, त्यांना आज सोडायचे नाही’ अशी चिथावणीखोर वक्तव्य करत गोंधळ घातला. त्यानंतर जमलेल्या जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक केली. त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.






