पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कुख्यात गुंड गजा मारणे याने मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केल्याप्रकरणी त्याला व त्याच्या साथीदारांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्याचा आदेश दिला.
गजानन उर्फ गजा मारणे (वय 48), प्रदीप पंधारे (वय 36), बापू बागल (वय 34), आनंता कदम (वय 37), गणेश हुंडारे (वय 39), रूपेश मारणे (वय 38), सुनील बनसोडे (वय 40), श्रीकांत पवार (वय 34), सचिन ताकवले (वय 32) अशी न्यायालयीन कोठडी झालेल्यांची नावे आहेत. मारणेसह त्याच्या 200 साथीदारांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. त्यापैकी मारणेसह 9 जणांना पोलिसांनी अटक केली, तर गुन्हा दाखल झालेल्यापैकी 27 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.
मारणे याला दोन खून प्रकरणात 2014 मध्ये अटक झाली. त्यानंतर त्याच्यावर व त्याच्या साथीदारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाली होती. त्याला नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवले होते. दरम्यान, दोन्ही खून प्रकरणांत सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी मारणे याची मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी त्याच्या हजारो समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करीत आरडाओरड केली.






