कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – एकाच गावातील तरुण आणि तरुणीने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. करवीर तालुक्यातील चुये या गावात ही घटना घडली आहे. लग्नासाठी कर्ज व्हायला नको, यासाठी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख तरुणीने चिठ्ठीत केला आहे. अनिकेत गोविंद पाटील (वय 21) आणि सानिका भीमराव व्हनाळकर (वय 18) अशी मृतांची नावे आहेत.
अनिकेत पाटील याने चुये येथील राहत्या घरी विषप्राशन केले, तर सानिका हिने आर. के. नगर येथे नातेवाईकांच्या घरी विषप्राशन केले. अनिकेतवर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी त्याचा मृत्यू झाला, तर सानिका हिचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला.
दरम्यान, प्रेमाला विरोध झाल्याने दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात सुरू होती. तर ‘लग्नासाठी कर्ज व्हायला नको. मला आता सहन होईना झालंय, म्हणून आत्महत्या करत आहे.’ असा उल्लेख तरुणीने चिठ्ठीत केला आहे.






