नवी दिल्ली – योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेकडून कोरोना विषाणूवरील नवे औषध शुक्रवारी लाँच करण्यात आले. कोरोना बरा होऊ शकतो, या पुराव्यावर हे औषध आणण्यात आले असल्याची माहिती यावेळी बाबा रामदेव यांनी दिली. कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते.
पतंजली संस्थेने गेल्यावर्षी कोरोना हमखास बरा होतो, असा दावा करत कोरोनिल नावाचे औषध बाजारात आणले होते. मात्र त्यावेळी मोठा गदारोळ उडाल्यानंतर पतंजलीला सारवासारव करावी लागली. पतंजलीने यावेळी आणलेल्या औषधाचे नाव कोरोनिल हेच असून कोरोना बरा होतो, या पुराव्यावर आधारित हे औषध आणण्यात आले असल्याचे बाबा रामदेव यांनी याप्रसंगी सांगितले. योग आणि आयुर्वेदला संशोधन आधारित उपचारामध्ये चिकित्सा पद्धतीच्या स्वरूपात मान्यता मिळत असल्याचेही बाबा रामदेव यांनी सांगितले.
विशेष म्हणजे आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला कोरोनावरील औषध म्हणून परवानगी दिली आहे. नवीन कोरोनिल औषध सीओपीपी- डब्ल्यूएचओ जीएमपी प्रमाणित असल्याचे पतंजलीचे म्हणणे आहे. बाबा रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनी कोरोनिल औषधाच्या वापरासाठी डीजीसीएपाठोपाठ जागतिक आरोग्य संघटनेची परवानगी मिळाली असल्याची माहिती दिली. 154 देशांत विक्री करण्यासाठी परवानगी प्राप्त झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.






