पत्नी तंबाखू खाते म्हणून घटस्फोट मिळणार नाही! पतीला न्यायालयाने सुनावले खडे बोल…

मुंबई (प्रतिनिधी) – तंबाखू खाण्याचे व्यसन जरी वाईट असले तरी, पत्नी तंबाखूचे सेवन करते या कारणास्तव पत्नीला घटस्फोट देता येणार नाही. असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. तसेच घटस्फोट देण्यासाठी हे कारण पुरेसे नसल्याचे सुद्धा न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. पतीने केलेले आरोप सामान्य असल्याचे नागपूर खंडपीठाने आपल्या निकालात म्हटले आहे.

पत्नीच्या तंबाखू खाण्याच्या सवयीमुळे तिला आजार झाला आणि तिच्यावर उपचार करण्यासाठी बरेच पैसे आपल्याला खर्च करावे लागले, असा आरोप पतीने न्यायालयात केला. मात्र हे सर्व आरोप न्यायालयाने फेटाळून लावले. तसेच पत्नीवर केलेल्या उपचाराचे कोणतेही बिल रेकॉर्ड किंवा वैद्यकीय कागदपत्रे न्यायालयात पती सादर करु शकला नाही.

न्यायालयात घटस्फोटासाठी पतीने दिलेले कारण गंभीर नसल्याचे कोर्टाने आपल्या निकालात स्पष्ट केले. या जोडप्याचे लग्न १५ जून २००३ रोजी झाले होते. काही दिवसानंतर दोघांमध्ये वादावादी सुरु झाली आणि पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. पत्नी घरातील कामे करत नाही. पत्नीला तंबाखू चघळण्याची वाईट सवय लागलेली आहे. ती सतत घरात भांडण करते. त्यामुळे आपण घटस्फोटाचा अर्ज सादर केल्याचे त्याने न्यायालयात सांगितले. न्यायालयाने त्याचे म्हणणे ऐकून घेत आरोप-प्रत्यारोप हे वैवाहिक जीवनातील एक गोष्ट असल्याचे नमूद केले.

न्यायालयाने काही जुन्या निकालांचा संदर्भ देत आपल्या निकालात हे स्पष्ट केले की, विवाहित जीवनाचे संपूर्ण मूल्यांकन केले पाहिजे, कोणत्याही कारणासाठी घटस्फोट मागता येणार नाही. तसेच पतीने आपल्याला २००८ साली एचआयव्ही झाल्याचे न्यायालयात कबूल केले आहे. तरी पत्नी २०१० पर्यत त्याच्यासोबत होती. त्यामुळे न्यायालयाने हा घटस्फोटाचा अर्ज अयोग्य कारणांमुळे फेटाळून लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here