मुंबई – राज्यात करोनासंदर्भात कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर आणू नका, नियमांचे पालन करा, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. पनवेल येथील न्हावा शेवा टप्पा ३ पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते. तेव्हा प्रसार माध्यमांसोबत संवाद साधताना त्यांनी हे आवाहन केलं आहे.
राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असताना काही जिल्ह्यांत पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल जनतेसोबत संवाद साधताना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनतेला कळकळीची विनंती केली आहे.
‘राज्यात पुन्हा करोनानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळं कार्यक्रम हे साधेपणानं घ्यावे लागत आहेत. लॉकडाऊन पुन्हा लागू होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कठोर निर्णय घेण्याची वेळ कृपा करुन आणू नका,’ असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
‘लॉकडाऊनमुळं संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी बिघडते. दिवसभर काम केल्यानंतर ज्यांची संध्याकाळी चूल पेटते, त्यांची तर एवढी बिकट अवस्था होतेय, हे आपण पाहिलंय. लॉकडाऊनची वेळ येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे,’ असंही अजित पवार म्हणाले.







