अहमदनगर – अहमदनगर तालुक्यातील वाळूंज शिवारात ४२ वर्षाच्या संतोष दत्तात्रय मोरे याची त्याच्याच पत्नीने भावाला सोबत घेऊन हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी संतोषची पत्नी प्रियांका आणि तिचा भाऊ रामेश्वर विठ्ठल दशवंत यांना अटक केली आहे. नगरमधील राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे रामेश्वर राहत होता. सततच्या घरगुती वादाला कंटाळलेल्या प्रियांका हिने तिच्या भावाच्या मदतीने पत्नीची हत्या केली. मात्र प्रियांका पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होती. भांडणावेळी पाय घसरुन पडल्याने पतीचा मृत्यू झाल्याची बतावणी तिने पोलीसांना केली होती.
मृताच्या शरीरावरील जखम आणि एकूण परिस्थिती पाहून पोलिसांना याबाबत
संशय निर्माण झाला. आणि पोलीसी खाक्या दाखवताच शेवटी सत्य बाहेर आले आणि पोलिसांनी तिला आणि तिच्या भावाला अटक केली. संतोष आणि प्रियंका यांच्यात सतत भांडणे होत होती. अनेकदा पती-पत्नीच्या भांडणात पत्नीचा भाऊ मध्यस्ती करत होता. मात्र रविवारी पुन्हा पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी प्रियांकाने भावाला फोन करुन घरी बोलावले. यावेळी संतोष काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे राग अनावर झालेल्या रामेश्वरने जवळच असलेल्या कुऱ्हाडीने संतोषवर वार केले. त्यामध्ये संतोषचा जाग्यावरच मृत्यू झाला. यामुळे घाबरलेल्या रामेश्वरने तेथून पोबारा केला आणि थेट आपल्या गावी निघून गेला.
पोलिसांना संतोषच्या मृत्यूची बातमी कळवण्यात आली. पोलिसांनी या घटनेची
प्रियांकाकडे माहिती विचारली असता, तिने पहिल्यांदा उडवा-उडवीची उत्तरे दिली. आणि रात्री भांडणाच्यावेळी संतोष पाय घसरुन पडल्याचे सांगितले.आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र संतोषच्या डोक्यातील जखमा आणि
पत्नीने दिलेली माहिती यामध्ये पोलिसांना तफावत असल्याचा संशय आला. त्यानंतर
पोलिसांनी प्रियांकाची कसून चौकशी केली असता तिने घडलेला खरा प्रकार सांगितला. आणि पोलिसांनी रामेश्वरच्या गावी जाऊन त्याला अटक केली.







