नागपूर – संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यातल्या त्यात विदर्भात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच नागपुरच्या एका मंगल कार्यालयामध्ये एकाच वेळी 8 लोक कोरोनाबाधित मिळाले आहे. एकाचवेळी 8 लोकांना
कोरोनाची बाधा झाल्याने प्रशासनाने मंगल कार्यालयाला टाळे ठोकले आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज झोन कार्यालयाने कळमना रोड येथील नैवेद्यम इस्टोरिया मंगल कार्यालयाला 10 मार्च पर्यंत पोलिसांनी सील केले आहे. याच मंगल कार्यालयात कोरोनाचे 8 रुग्ण मिळाले होते.
मंगल कार्यालयातील लोकांना कोरोनाची लक्षणे आढळत होती. त्यानंतर त्यांची चाचणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं. यामध्ये कार्यालयात स्वयंपाक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे एकच धांदल उडाली आहे.
एकाचवेळी 8 लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगल कार्यालय सील करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसंच या परिसराला कन्टेनमेंट (विलगीकरण) क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे.
नागपुरात लॉकडाऊन नाही पण कठोर निर्बंध
नागपुरात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. परंतु तूर्तास लॉकडाऊन केलं जाणार नाही. मात्र कठोर निर्बंध लावले जातील, अशी माहिती नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. नागपुरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
संपूर्ण विदर्भात तसंच नागपूर शहरात कोरोनाचं संक्रमण वाढतं आहे. दिवसेंदिव अधिक संख्येने कोरोना रुग्ण मिळत आहेत. असं असलं तरी सध्या शहरात लॉकडाऊन लावणार नाही मात्र कठोर निर्बंध लावणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नागपूर शहरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे शहरातील बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या काळात जास्तीत जास्त ट्रेसिंग करुन तसंच कोरोना चाचण्या करुन साखळी तोडण्याचं काम आरोग्य विभाग करेल, असं ते म्हणाले.






