जगातील २० टक्के करोनाबाधितांचे मृत्यू ‘या’ देशात

वॉशिंग्टन – अमेरिकेत करोना संसर्गाचे थैमान सुरूच असल्याचे चित्र आहे. करोनाच्या आजाराने झालेल्या मृत्यूंची संख्या पाच लाखांहून अधिक झाली आहे. संपूर्ण जगात करोनामुळे झालेल्या मृत्यूंपैकी जवळपास २० टक्के मृत्यू हे अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या दोन कोटी ७८ लाखांहून अधिक नोंदवण्यात आली आहे.

जगभरातील करोनाबाधितांची संख्या ११ कोटी १९ लाख ५७ हजार ४९४ इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यापैकी २४ लाख ७७ हजार ८३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आठ कोटी ७३ लाख १९ हजार ४३२ जणांनी करोनावर मात केली आहे. जगात करोनाचा सर्वाधिक संसर्ग अमेरिकेत झाला आहे. अमेरिकेत करोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे करोनाबाधितांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेतील संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. अँथोनी फॉस्सी यांनी ‘सीएनएन’वरील एका कार्यक्रमात सांगितले की, याआधी अशाप्रकारचा साथ आजार पाहिलाच नव्हता. १०२ वर्षांपूर्वी १९१८ मध्ये आलेल्या इन्फ्लूएंझा महासाथीच्या आजारानंतर ही महासाथ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेत, मागील महिन्यात १९ जानेवारी रोजी करोनामुळे झालेल्या मृ्तांची संख्या चार लाख नोंदवण्यात आली होती. अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे पहिला मृत्यू जानेवारी २०२० मध्ये नोंदवण्यात आला होता. त्यानंतरच्या चार महिन्यातच एक लाख मृतांची संख्या नोंदवण्यात आली होती. सप्टेंबर २०२० मध्ये दोन लाख आणि डिसेंबर २०२० मध्ये तीन लाखांवर करोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा पोहचला. त्यानंतर एक महिनाभरात आणखी एक लाख मृतांची नोंद करण्यात आली.

अमेरिकेत करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्याासाठी लसीकरण मोहीम आणि इतर उपाययोजनाही आखण्यात आल्या आहेत. यामध्ये मास्कचा वापर अनिवार्य करणे, सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे आदी नियमांचाही समावेश आहे. अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन १०० दिवसांमध्ये करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here