लष्करात मिळणार महिलांना प्रवेश – सौदी अरेबिया

रियाध – कट्टरवादी इस्लामिक कायद्यांसाठी ओळखल्या सौदी अरेबिया सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाच्या लष्करात आता महिलांनाही प्रवेश दिला जाणार आहे. भूदल, नौदल आणि हवाई दलासह रॉयल स्ट्रेटेजिक मिसाइल फोर्स आणि वैद्यकीय सेवेत महिलांची भरती करण्यात येणार आहे. सौदी अरेबिया सरकारचा निर्णय महत्त्वाचा समजला जात आहे.

सौदी संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महिलाही लष्करी सेवेत भरती होण्यासाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे. सैनिक, लान्स नायक, नायक, सार्जेंट आणि स्टाफ सार्जेंट पदासाठी महिलांची भरती करण्यात येणार आहे. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या ‘व्हिजन २०३०’ च्या धोरणानुसार सौदी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. क्राउन प्रिन्स सौदी अरेबियातील महिलांना विविध क्षेत्रात संधी देण्याचे धोरण अवलंबत आहेत.

सौदी अरेबियातील २१ ते ४० या वयोगटातील महिलांना लष्करात सहभागी होण्यासाठीची संधी मिळणार आहे. सरकारी सेवेत असलेल्या महिलांना अर्ज करता येणार नाही. वैद्यकीयदृष्ट्या सक्षम आणि कोणताही गुन्हा दाखल नसलेल्या महिलांना अर्ज करता येणार आहे.

सौदी अरेबिया सरकारने या योजनेची घोषणा वर्ष २०१९ मध्ये केली होती. सौदी अरेबिया महिलांसाठी विविध क्षेत्र खुलं करत असल्याचे चित्र असले तरी महिला अधिकार कार्यकर्ती लुजैन अल हथलौलला सहा वर्षांसाठी तुरुंगात डांबले होते. काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय दबावानंतर तिची सुटका करण्यात आली. जवळपास एक हजार दिवसांचा तुरुंगवास तिने भोगला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here