इम्रान खान यांना भारतीय हवाई हद्दीतून उड्डाणाला परवानगी

नवी दिल्ली – भारताने मनाचा मोठेपणा दाखवत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विमानाला आपल्या हवाई हद्दीतून उड्डाण करण्यासाठी परवानगी दिली आहे. इम्रान खान पहिल्यांदाच श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून या वेळी त्यांचे विमान भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार आहे.

23 फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांचा श्रीलंका दौरा नियोजित आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी नाकारली होती. नरेंद्र मोदी अमेरिका आणि सौदी अरेबिया दौऱ्यावर असताना ही परवानगी नाकारण्यात आली होती. कश्मीरमध्ये मानवाधिकार हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे सांगत पाकिस्तानने भारताला स्पष्ट नकार दिला होता, पण हे सारे विसरून भारताने मात्र पंतप्रधान इम्रान खान यांच्या पहिल्या श्रीलंका दौऱ्यासाठी प्रवासाला आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here