वाशिम (प्रतिनिधी संदीप शिरपूरकर) – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला आज सोळा दिवस उलटून गेले आहेत. मात्र तरीही तिच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या प्रकरणात गेल्या पंधरा दिवसांपासून गायब असलेले वनमंत्री संजय राठोड नुकतेच पोहरादेवीला प्रकटले. याठिकाणी त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करून पोहरादेवी गडावर पत्रकारांशी संवाद साधला आहे.
यावेळी त्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकणात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. पण पोहरादेवीला संजय राठोड यांचे साधारणतः 8 ते 10 हजार समर्थक जमले होते. सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणू फोफावत असताना अशाप्रकराचं शक्तीप्रदर्शन करणं, सार्वजानिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता रात्री आठ वाजता वाशिम पोलिसांना जाग आली.
कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाराजी व्यक्त केल्यानंतर वाशिम पोलिसांनी संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या 10 हजार लोकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश होण्याची शक्यता आहे. पण मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पोलिसांना गर्दी दिसली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा गुन्हा काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे संजय राठोड यांनी सकाळी शक्ती प्रदर्शन केलं असताना वाशिम पोलिसांना गुन्हा दाखल करायला एवढा वेळ का लागला असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.






