मनपा उपायुक्त संतोष वाहुळेंची कारवाई
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेल्या तीन दिवसांपासून गर्दीचे ठिकाणे असलेले लॉन्स्, मंगलकार्यालये यांच्यावर कारवाई केली जात आहे. मंगळवारी डिमार्टमध्ये पाहणी केली असता, जवळपास 800 ते 900 ग्राहकांची गर्दी दिसून आली. त्यामुळे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी डिमार्टवर सीलची कारवाई केली.
शहरासह जिल्ह्यात कोरोना उद्रेक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. असे असतांनाही कोरोना प्रतिबंधक उपायोजना केल्या जात नाही. तसेच सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
रविवारपासून शहरासह जिल्ह्यात मंगलकार्यालये, लॉन्स्वर कारवाई केली जात आहे. त्याच अनुषंगाने सायंकाळी 6.45 वाजता मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह संजय ठाकूर, नाना कोळी, नितीन भालेराव, साहेबराव शंखपाळ, किशोर सोनवणे यांच्या पथकाने डिमार्टमध्ये जावून पाहणी केली. दरम्यान जवळपास 800 ते 900 ग्राहक आढळून आले. त्यामुळे सर्व ग्राहकांना आवाहन करुन त्यांना बाहेर काढण्यात आले. आणि त्यानंतर सीलची कारवाई करण्यात आली.
दरम्यान रविवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी हतनूर सभागृहात जावून पाहणी केली होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आल्याने जिल्हाधिकार्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आज मनपा प्रशासनाच्या पथकाने हतनूर सभागृहदेखील सील केले आहे.






