पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अजून एक ऑडिओ क्लिप व्हायरल

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तब्बल पंधरा दिवसांनंतर वन मंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथे माध्यमांसमोर आले. या प्रकरणात पोलीस चौकशी करत आहे, चौकशी पूर्ण होईपर्यंत आपल्याला काहीही बोलायचं नाही, असेही ते म्हणाले. मात्र पुणे पोलीस खरंच या प्रकरणाची नेमकी काय चौकशी करत आहेत. गेल्या पंधरा दिवसात पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह एकही आयुक्तालयातला बडा अधिकारी या विषयावर बोलायला तयार नाही. त्यातच पूजा चव्हाण प्रकरणात आणखी एक अशीच ऑडिओ क्लिप पुन्हा व्हायरल झाली आहे.

या क्लिपमध्ये फोनवर बोलणारी तरुणी ‘तुमच्या विनंतीवरून तुमचा नंबरचा ब्लॉक काढला आहे. तुमच्या पुढे आम्हाला जाता येत नाही’ असं म्हणत लाडाने ‘यंदा पुण्या-मुंबईला नको जम्मू-काश्मीर, कुल्लू मनालीला न्या’ अशी विनंती ही करताना दिसते. तर समोरून बोलणारी व्यक्ती सोबत लोकं असल्यामुळे फार बोलता येत नाही, आपण पाहिजे तिथे जाऊ, असं म्हणते.

ही ऑडिओ क्लिप पूजा चव्हाण हिच्या लॅपटॉपमधून लीक झाली असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या सगळ्या प्रकरणाचा तपास करणारे पुणे पोलीस यावर काहीच बोलायला तयार नाहीत. यापूर्वीच्या ही 11 क्लिप आल्या कुठून आणि वनमंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्या मोबाईलचे सीडीआर या कुठल्याही गोष्टीचा तपास पुणे पोलीस करत नाही. पुणे पोलिसांतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता केवळ तपास सुरू आहे. एवढेच उत्तर गेले पंधरा दिवस पुणे पोलिसांकडून दिले जात आहे. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलीस दबावाखाली आहेत का असा प्रश्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here