फी वसुलीसाठी तगादा लावणार्‍या शाळांवर कारवाई करण्याचे शिक्षणमंत्री ना.वर्षा गायकवाड आदेश

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – करोना संकटामुळे शाळा बंद असताना फी वसुलीसाठी तगादा लावणार्‍या शाळांची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

शाळांनी अन्यायकारक फी वसुलीसाठी तगादा लावणे, ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर काढणे, मागील सत्र परीक्षेची गुणपत्रिका न देणे, उशिरा फी भरणार्‍या विद्यार्थ्यांकडून दंड वसूल करणे अशा स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून याबाबत ज्या शाळांसंदर्भात अशा तक्रारी आहेत त्या शाळांची संबंधित शिक्षणाधिकार्‍यांमार्फत त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निर्देश शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिले आहेत.

राज्यातील विविध भागातून आलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गायकवाड यांच्या दालनात नुकतीच शालेय शुल्क वाढीसंदर्भात बैठक झाली. बैठकीमध्ये शाळांच्या शुल्कासंबधीत विषयांवर चर्चा करण्यात आली. खाजगी शाळांमधील शुल्काबाबत शासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियमव महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम तयार केलेले आहेत. तथापि नियमाची अंमलबजावणी करताना प्रशासकीय स्तरावर अडचणी येतात.तसेच शाळेतील शुल्काबाबत पालकांच्या सातत्याने तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. म्हणून या अधिनियमामध्ये ,नियमामध्ये सुधारणा सुचविण्यासाठी सहसचिव शालेय यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.

या समितीमध्ये संचालक बालभारती,सहसचिव विधी (शालेय शिक्षण), सहसंचालक प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षण उपनिरीक्षक, मुंबई, वरिष्ठ लेखापरीक्षक, सोलापूर, अधीक्षक शिक्षण आयुक्त कार्यालय या सदस्यांचा समावेश आहे. राज्यस्तरीय व विभागीय शुल्क नियंत्रण समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. या समित्यांकड़े फी वाढीबाबतच्या पालकांच्या तक्रारी पाठविण्यात याव्या गायकवाड यांनी सांगितले. तर अनधिकृतपणे चालविल्या जाणार्‍या शाळांवर शिक्षण ह्क्कानुसार ( आरटीई) नुसार कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here