मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – मालाडच्या बांगूरनगरमध्ये राहणाऱ्या सुरेश पुजारी उर्फ सुर्या या तृतीयपंथाच्या प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मालाडमधील रुमानिया हॉटेलजवळून जात असताना काही अज्ञात इसमांनी सुर्यावर हल्ला केला, अशी माहिती बुलंद पोलिस टाईम्सला पोलिसांनी दिली आहे.
सूर्यावर हल्ला होताच त्याने आरडा ओरड सुरु केली. आणि आरोपींसोबतसोबत दोन हात करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी एका आरोपीने आपल्याकडील चाकू काढून सूर्याच्या मानेवर वार केला. हे सर्व भर दिवसा होत असल्याने तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सूर्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आरोपींना पकडण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले.
स्थानिकांनी जखमी अवस्थेत असलेल्या सूर्याला स्थानिक रुग्णालयात नेले. आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मात्र रुग्णालयात दाखल होण्याअगोदरच सूर्याचा मृत्यू झाला होता. पोलीसांनी अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. सूर्या यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि खिशातील पाकिटाला आरोपींनी हात सुद्धा लावला नसल्यामुळे आरोपींचा सूर्याची हत्या करणे हाच मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी बुलंद पोलिस टाईम्सला सांगितले आहे. पोलीसांनी प्राथमिक तपास केला असता हे कारण समोर आले आहे.
सूर्याची हत्या करण्याचा आरोपींचा पूर्वनियोजित कट असल्याचा पोलिसांना संशय आहे. सूर्याच्या रोजच्या हालचालीवर आरोपींचे लक्ष असल्याचे या हत्येवरुन दिसून येत आहे. सध्या पोलिस परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटिव्हीची तपासणी करत आहेत. आणि घटनास्थळी जे नागरिक उपस्थित होते त्यांचा जबाब नोंदवून घेत आहेत. पोलिसांना या हत्येमागे तीन मारेकरी असल्याची माहिती मिळाली आहे. त्या दिशेने तपास सुरु आहे.






