अहमदाबाद – होमग्राऊंडवर खेळणारा अक्षर पटेल आणि अनुभवी आर. अश्विन यांच्या फिरकीपुढे इंग्लंड संघानं लोटांगण घेतलं आहे. भारतीय संघाप्रमाणेच इंग्लंडचा दुसरा डावही गडगडला. अक्षर पटेल आणि अश्विन या फिरकीपुढे इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावांत फक्त ८१ धावांपर्यंत मजल मारु शकला. अक्षर पटेल यानं पुन्हा एकदा पाच गडी बाद करण्याची किमया केली आहे. तर अश्विन यानं दुसऱ्या डावांत चार गड्यांना तंबूत धाडलं. वॉशिंगटन सुंदर यानं एक बळी मिळवला. अक्षर पटेल यानं पहिल्या डावांत सहा गडी बाद केले होते. तिसऱ्या कसोटी सामन्यात अक्षर पटेल यानं ११ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. तर अश्विन यानं सात गडी बाद केले आहेत.
दुसऱ्या डावांत इंग्लंडच्या एकाही फलंदालाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. इंग्लंडकडून बेन स्टोक्सनं सर्वाधिक २५ धावा केल्या. तर कर्णधार जो रुट अवघ्या १९ धावांवर अक्षर पटेलचा शिकार ठरला. इंग्लंडच्या चार फलंदाजांना खातेही उघडता आलं नाही. तर फक्त तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या ओलांडता आली.
अहमदाबाद येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि फिरकीपटू जॅक लीच यांच्या फिरकीपुढे ‘टीम इंडिया’च्या दिग्गजांनी गुडघे टेकले. लीच-रुट जोडीने तब्बल ९ गडी बाद करत भारतीय संघाला १४५ धावांत गुंडाळलं. रोहित शर्माचा (६६) अपवाद वगळता एकाही भारतीय खेळाडूला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला होता, त्यामुळे भारताला पहिल्या डावाअखेरीस केवळ ३३ धावांची आघाडी मिळाली. पहिल्या दिवशी ५७ धावांवर नाबाद असणारा रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे दुसऱ्या दिवशी लागोपाठ तंबूत परतले. मुंबईकर फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला. जॅक लीच यानं सर्वात आधी अजिंक्य रहाणेचा अडथळा दूर केला. त्यानंतर जम बसलेल्या रोहित शर्मालाही तंबूचा रस्ता दाखवत भारताला अडचणीत पाडलं.
अश्विनचे कसोटीतील ४०० बळी
दुसऱ्या डावांत तिसरा बळी घेत अश्विन यानं कसोटी क्रिकेटमध्ये ४०० व्या बळींची नोंद केली आहे. अश्विन यानं २१ हजार २४२ चेंडूमध्ये ४०० बळी घेतले आहेत. तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चरला बाद करत अश्विननं हा माईलस्टोन गाठला. ४०० कसोटी बळींचा टप्पा गाठणारा एकूण १७ वा आणि भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. याआधी कपील देव, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह या भारतीय गोलंदाजांनी हा विक्रम केला आहे. २०११ मध्ये कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या अश्विन यानं ७७ व्या कसोटी सामन्यात ४०० बळींचा टप्पा पार केला आहे.
अनुभवी जोडी मैदानाबाहेर गेल्यानंतर सर्व मदार नवख्या ऋषभ पंतवर होती. मात्र, कामचलाऊ फिरकी गोलंदाज आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यानं ऋषभ पंत आणि वॉशिंगटन सुंदर यांना माघारी धाडलं. अवघ्या १२५ धावांवर भारतीय संघाचे आठ फलंदाज माघारी परतले आहेत. अजिंक्य रहाणे ७ आणि ऋषभ पंत १ धावेवर स्वस्तात बाद झाले. रविचंद्रन अश्विन १७ धावा काढून तंबूत परतला. अश्विनला जो रुट यानं बाद केलं. सध्या पहिल्या डावांत भारतीय संघाकडे फक्त २२ धावांची आघाडी आहे. लोकल बॉय अक्षर पटेल याला फलंदाजीत अपयश आलं. शून्य धावसंख्येवर रुट यानं त्याला बाद केलं.
दरम्यान, गुलाबी चेंडूने पहिल्या दिवसापासूनच वळण घेतल्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या प्रकाशझोतातील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवलं. फिरकीपटू अक्षर पटेल यानं (६/३८) घरच्या प्रेक्षकांसमोर केलेल्या अप्रितिम गोलंदाजीच्या बळावर भारताने इंग्लंडला पहिल्या डावांत ११२ धावांवर रोखलं. त्यानंतर रोहित शर्मा यानं नाबाद अर्धशतक झळकावत भारताला मजबूत स्थितीत आणले. पहिल्या दिवस अखेरीस भारताने तीन बाद ९९ धावांपर्यंत मजल मारली असून पहिल्या डावात यजमान फक्त १३ धावांनी पिछाडीवर आहेत. सलामीवीर शुबमन गिल (११) आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा (०) स्वस्तात माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या साथीनं रोहितनं तिसऱ्या गड्यासाठी ६४ धावांची भागीदारी रचली. कोहली दिवसाच्या शेवटच्या षटकांत २७ धावांवर त्रिफळाचीत झाला. रोहितने मात्र सलग दुसऱ्या कसोटीत अर्धशतक झळकावलं.
दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनने इंग्लंडचा अष्टपैलू गोलंदाज बेन स्टोक्स याला पायचीत केलं. बेन स्टोक्ससाठी अश्विन पहिल्यापासूनच कर्दनकाळ ठरला आहे. आतापर्यंत २० डावांपैकी ११ डावात अश्विनने बेन स्टोक्सला माघारी धाडलं. डावखुऱ्या फलंदाजांसाठी अश्विनची फिरकी नेहमीच सापळ्यासारखी भासते. अश्विनने इंग्लंडचा माजी कर्णधार अलिस्टर कूकला ९ वेळा, ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला १० वेळा, एड कॉवनला ७ वेळा तर जेम्स अँडरसनला ७ वेळा माघारी धाडलं आहे.
अक्षर पटेलने इंग्लंडच्या पहिल्या डावात ३८ धावा देऊन ६ गडी बाद केले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी केली. या डावात त्याने ३२ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. एका सामन्यात सर्वात कमी धावा देऊन १० गडी टिपण्याचा विक्रम त्याने केला. तसेच, अक्षर पटेलची ही कामगिरी दिवस-रात्र कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. या आधी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने एका सामन्यात सर्वाधिक १० बळी टिपले होते. तर वेस्ट इंडिजच्या देवेंद्र बिशूने भारताविरूद्ध दीडशेहून अधिक धावा देत १० बळींचा टप्पा गाठला होता. अश्विनने मात्र ७० धावा देत ११ गडी बाद केले.






