मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – ५ फेब्रुवारी रोजी सुमारे ९० टक्के भाजलेल्या अवस्थेत सुरज कुमार दुबे या नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याने आपल्या मृत्यू पूर्व जबानीत नौदलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले खंडणीसाठी अपहरण करुन मारुन टाकण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. घोलवड पोलिसांकडे अशी फिर्याद सुद्धा त्याने दिली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. पालघर पोलिसांनी दहा पथके तयार करुन याचा विविध ठिकाणी तपास सुरु केला. मात्र यामागील सत्य अखेर उघडकीस आले. हे प्रकरण अपहरण व खंडणीचे नसून आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पालघर पोलीसांनी काढला आहे.
नौदल अधिकाऱ्याने आपले ३० जानेवारी रोजी चेन्नई विमानतळाच्या बाहेरुन अपहरण करण्यात आल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र चेन्नई विमानतळ तसेच विमानतळाजवळ असलेल्या एक हॉटेलमधील आणि एका बस स्टॅड जवळील सीसीटिव्ही फुटेज पाहता मृत अधिकारी हा मुक्तपणे तिथे वावरत असल्याचे पुरावे पोलिसांना प्राप्त झाले. आणि हा बनाव उघडकीस आला.
३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान या नौदल अधिकाऱ्याने चेन्नई ते वेल्लोर दरम्यान प्रवास करुन वेल्लोर येथील काही हॉटेलमध्ये एकटा राहिल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. त्याचप्रमाणे एकट्याने एटीएममधून पैसे काढल्याचे देखील पुरावे पोलिसांना सापडले आहे.
या नौदल अधिकाऱ्याने मुंबई शेअर बाजारात सुमारे पावणे अठरा लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. त्या शेअर व्यवहारात पूर्णपणे बुडून गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तलासरी नाक्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपावरुन ५ फेब्रुवारी रोजी पहाटे एका व्यक्तीने दोन प्लॅस्टीकच्या बॉटलीमध्ये डिझेल घेतल्याचे सीसीटिव्ही कैद झाल्याचे पोलिसांनी तपासले आणि त्यातील व्यक्तीची प्रतिमा मृत अधिकाऱ्याशी मिळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे खंडणी व अपहरण या मार्गाने सुरु असलेला पोलिसांचा तपास आता आत्महत्येच्या दिशेने वळाला आहे.






