मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – जमिनीवरुन हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या व्हीएल-एसआरएसएएम या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारताने केली. संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या म्हणजे डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी चांदीपूर येथे स्वदेशी वर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सर्फेस टू एअर मिसाईची यशस्वी चाचणी केली.
अवघ्या तीन तासानंतर पुन्हा एकदा एलसी-३ ची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी सुद्धा यशस्वी ठरली. त्यामुळे भारताचे हवाई संरक्षण क्षेत्रात या चाचणीमुळे नवे आयाम प्रस्थापित झाले आहेत. हे मिसाईल नौदल आणि हवाई दलाला अधिक सक्षम करण्याचे काम करणार आहे. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.
डीआरडीओ हे मिसाईल मेक इन इंडिया अतंर्गत तयार केले आहे. या यशस्वी चाचणीमुळे भारताला यापुढे मिसाईल तंत्रज्ञानासाठी कोणत्याही इतर देशावर अवलंबून राहावे लागणार नाही. हे जमिनीवरुन हवेत झेपावणारे क्षेपणास्त्र आहे. याची ४० किलोमीटरपर्यत लक्ष साध्य करण्याची क्षमता आहे. हे मिसाईल चारही दिशेने मारा करु शकते. ड्रोन, क्षेपणास्त्र किंवा लढाऊ विमानाचा अचूक वेध घेण्यासाची क्षमता या मिसाीलमध्ये आहे. कोणत्याही लहानातल्या लहान जागेला शंभर टक्के सुरक्षा देण्याचे काम हे क्षेपणास्त्र करु शकते.






