पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक सदा डुंबरे यांचे गुरुवारी सायंकाळी पुण्यात एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी प्रा. शुभांगी, दोन मुले असा परिवार आहे.
समकालीन राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारा एक परखड संपादक अशी सदा डुंबरे यांची ओळख होती. मराठी पत्रकारितेत आपल्या वेगळ्या विषयामुळे आणि लेखन शैलीमुळे प्रभावी ठसा उमटवणारे सदा डुंबरे यांची संपूर्ण वृत्तपत्रीय कारकीर्द सकाळ वृत्तपत्र समूहाशी जोडलेली होती.
साप्ताहिक सकाळचे ते सलग एकवीस वर्षे संपादक होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने उत्कृष्ट संपादनासाठी त्यांना गेल्या वर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.






