..तर शाळा पुन्हा बंद ठेवाव्या लागणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – देशासह राज्यभरात जानेवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या घटल्याचं पाहायला मिळालं. याच कारणामुळे अनेक ठिकाणी निर्बंधही शिथील करण्यात आले. सोबतच काही नियमांसह विद्यार्थ्यांच्या शाळाही सुरू करण्यात आल्या. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार झपाट्यानं वाढू लागल्यानं अनेक ठिकाणी शाळांना पुन्हा एकदा कुलूप लावलं गेलं आहे. अशातच आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यकता वाटल्यास शाळा बंद ठेवाव्या, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

अनेक ठिकाणी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे, ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे, तिथे आवश्यक स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत, असं वर्षा गायकवाड यांनी समाज माध्यमाच्या माध्यमातून सांगितलं आहे.

राज्यात काही जिल्ह्यांमधील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात घेऊन समाजकल्याण, आदिवासी विकास विभाग यांसह विविध विभागांशी चर्चा करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येत आहे, असंही गायकवाड यांनी सांगितलं आहे. वाशीमच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील निवासी शाळेतील चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहातील २२९ विद्यार्थी बुधवारी कोरोनाबाधित आढळले होते. आता या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here